दुष्काळसदृश परिस्थितीत माणसांनाच नव्हे, तर मुक्या प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत यावल शहरातील सोनार कुटुंबाने माणुसकीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. दररोज २०० लिटर पाण्याची व्यवस्था करून मुक्या प्राण्यांची तहान भागवली जात आहे.

यावल शहरातील गणपती नगर येथे राहणारे नितीन सोनार यांनी कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम सुरू केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक असलेल्या नितीन सोनार यांनी आपल्या घरासमोर सुमारे २०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ठेवली असून, त्यामध्ये दररोज नियमित पाणी भरून ठेवले जाते.

उन्हाची तीव्रता आणि पाण्याची कमतरता यामुळे भटकी जनावरे तसेच इतर मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या तहानेची सोय व्हावी, या उदात्त हेतूने सोनार कुटुंबाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

दुष्काळी परिस्थितीत मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. माझ्याप्रमाणेच इतरांनीही असा उपक्रम राबवावा, असे आवाहन नितीन सोनार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *