केळी पीक विम्याचे ट्रिगर लागू होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. दिवाळीच्या काळातही विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, विमा कंपनीविरोधात यावल तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०२५-२६ मध्ये प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेअंतर्गत केळी पिकाचा विमा काढला होता. ट्रिगर लागू झालेले असतानाही विमा कंपनीने तालुक्यातील प्रत्येक सर्कलसाठी वेगवेगळे ट्रिगर लावून शेतकरी आणि शासनाची फसवणूक केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

उन्हाळा आणि हिवाळ्याच्या ट्रिगरचे पैसे ऑगस्ट महिन्यापर्यंत देणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. दुष्काळी परिस्थिती असताना विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या प्रकरणात तहसीलदार, यावल यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि विम्याची रक्कम लवकरात लवकर अदा करण्याचे निर्देश विमा कंपनीला द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर निलेश सुरेश येवले, सोनाली श्रावगी, कैलास रमेश चौधरी, योगेश मुकेश येवले, अतुल रामराव भोईटे, दशरथ सोनू पाटील, निलेश देशमुख, सुभाष गब्बू चौधरी, आशिष मुरलीधर पाटील, रोशन सुभाष चौधरी, निखिल जयप्रकाश देशमुख आणि मनोज शिरीष देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *