जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात शेतरस्त्याच्या वादामुळे अनेक महिन्यांपासून अडचणीत असलेल्या ४२ शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. नायब तहसीलदारांनी दुसऱ्यांदा थेट घटनास्थळी धडक देत कोणताही तणाव किंवा पोलीस बळ न वापरता सामोपचारातून हा वाद मिटवला आहे.
एरंडोल तालुक्यातील मौजे कासोदा येथे मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ च्या कलम ५ अन्वये प्रलंबित असलेल्या शेतरस्त्याच्या वादावर महसूल प्रशासनाने महत्त्वपूर्ण कारवाई केली. नायब तहसीलदार अमोल बन यांनी सलग दुसऱ्यांदा थेट घटनास्थळी भेट देऊन अनेक महिन्यांपासून बंद असलेला वहिवाटीचा रस्ता खुला केला. या निर्णयामुळे ४२ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कासोदा येथील शेतकरी छाया उत्तम क्षीरसागर यांच्यासह इतर ४१ शेतकऱ्यांचा गट क्रमांक ४३० व इतर जमिनीवरून शेतीच्या कामासाठी वहिवाटीचा रस्ता आहे. मात्र, जयप्रकाश पोपटराव पाटील यांनी हा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अडवून ठेवला होता. त्यामुळे शेतीच्या मशागतीसह इतर कामांसाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. याप्रकरणी छाया क्षीरसागर व इतर शेतकऱ्यांनी एरंडोल तहसील कार्यालयात मामलेदार कोर्ट कायद्यानुसार अर्ज दाखल केला होता.
अधिकार विकेंद्रीकरणाचा १५ दिवसांत परिणाम!
प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा व्हावा, यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि एरंडोलचे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार, तहसीलदारांकडे असलेले मामलेदार कोर्ट कायद्याच्या कलम ५ चे अधिकार नायब तहसीलदारांकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. या अधिकार विकेंद्रीकरणानंतर अवघ्या १५ दिवसांत महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई करत सलग दुसऱ्यांदा जागेवरच यशस्वी निवाडा केला आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या गतिमान व लोकाभिमुख प्रशासनाच्या धोरणानुसार, तसेच उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अमोल बन यांनी गट क्रमांक ४३० येथे प्रत्यक्ष भेट दिली. दोन्ही बाजूंचे म्हणणे शांततेत ऐकून घेत वस्तुस्थितीची पाहणी केली आणि वादी-प्रतिवादींमध्ये सामोपचाराने समेट घडवून आणला.
आपसी समजुतीतून रस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयातील हेलपाटे, वेळ आणि अनावश्यक खर्च वाचला आहे. या शांततापूर्ण कारवाईमुळे एरंडोल तालुक्यात महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.
यावेळी नायब तहसीलदार अमोल बन म्हणाले की, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि ग्राम महसूल अधिकारी आकाश बनकर यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे हा रस्ता वाद जागेवरच मिटवणे शक्य झाले. नागरिकांना कोणत्याही त्रासाशिवाय जलद न्याय देणे हाच महसूल प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
