भारतीय जनता पक्षात गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत असलेले तेजराव थोरात यांनी पक्षातील आपला प्रवास आणि पक्षाविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या, सन्मान आणि संधींचा उल्लेख करत त्यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला असून, भाजपच्या निर्णय प्रक्रियेवरही स्पष्ट भाष्य केले आहे.
गेल्या ४० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचे तेजराव थोरात यांनी सांगितले. या प्रदीर्घ राजकीय प्रवासात पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत तीन वेळा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. याशिवाय पक्षसंघटनेतील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. तत्कालीन युती सरकारच्या काळात महामंडळावर काम करण्याची जबाबदारीही पक्षाने सोपवली, तसेच विविध संघटनांमध्ये अनेक जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेची महायुती होती. त्यावेळी भाजपच्या वाट्याला बाळापूर, अकोला पश्चिम आणि मूर्तिजापूर हे तीन मतदारसंघ होते, तर अकोला पूर्व आणि अकोट हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला होते. त्या काळात बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी भाजप-शिवसेना युती तुटली. त्यानंतर पक्षाने त्यांना बाळापूर मतदारसंघाचा एबी फॉर्म दिला.
अकोला पूर्व मतदारसंघ त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला असल्याने त्यांनी त्या मतदारसंघावर कधीही दावा केला नव्हता. युती तुटल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत पक्षाने योग्य निर्णय घेत रणधीर भाऊ सावरकर यांना उमेदवारी दिली. पक्षाचा निर्णय नेहमीच सर्वोच्च राहिला असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपदापासून महामंडळावरील जबाबदारीपर्यंत विविध संधी देणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष असल्याचे सांगत, पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पक्षनिष्ठा, संघटना आणि पक्षाचा निर्णय यांना वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा नेहमीच प्राधान्य दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या नावाचा उल्लेख करून पक्षावर नाराजी आहे, सन्मान झाला नाही किंवा अन्याय झाला, अशा प्रकारच्या बातम्या अथवा गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन तेजराव थोरात यांनी केले. आपली कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्यांचा भाजपशी संबंध नाही किंवा जे पक्षाचे साधे सदस्यही नाहीत, त्यांनी भाजपच्या अंतर्गत विषयांवर भाष्य करण्यापूर्वी पक्षाचे सदस्य व्हावे, असे मतही थोरात यांनी व्यक्त केले. भाजप निर्णय घेताना सर्वसंमती, परिस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या विचारांचा विचार करून निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
४० वर्षांची पक्षनिष्ठा हीच आपली ओळख असून, भारतीय जनता पक्ष हीच आपली राजकीय विचारधारा असल्याचे तेजराव थोरात यांनी स्पष्ट केले. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता हा आपला स्वाभिमान, विश्वास आणि आत्मा असल्याचे सांगत, पक्ष जो आदेश देईल आणि जी जबाबदारी सोपवेल, तिचे पालन करणारा आपण एक सामान्य कार्यकर्ता असल्याचे त्यांनी म्हटले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचा उल्लेख करत, आपल्या कुटुंबावरही संघाचे संस्कार आणि विचार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा आदेश आणि जबाबदारी शेवटपर्यंत पाळणारा पाईक असल्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.
