एकीकडे दोन हजार रोपे जगवण्यासाठी पर्यावरणप्रेमींची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे कासोदा परिसरात जुन्या डेरेदार वृक्षांची खुलेआम कत्तल होत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
एरंडोल तालुक्यातील कासोदा परिसरात वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, चिंच आणि जांभूळ यांसह अनेक जुन्या वृक्षांची विनापरवाना तोड होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. कापलेले लाकूड ट्रॅक्टर, मालवाहू गाड्या आणि आयशरमधून वखारींमध्ये तसेच बाहेरगावी पाठवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या हस्ते ग्रीन आर्मीने लोकसहभागातून राजमार्गाच्या दुतर्फा दोन हजारांहून अधिक रोपांची लागवड केली होती. ही रोपे जगवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.
वनविभागाकडून तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ पुरावे वरिष्ठ प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहेत.
