बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील संग्राम चौकात रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत रोहित्र नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना झालेल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आष्टी तालुक्यातील कडा येथील संग्राम चौक हा बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा चौक आहे. मात्र, याच चौकात रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत रोहित्र गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीत आहे. या रोहित्राभोवती कोणतेही संरक्षक कठडे किंवा धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत.

त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, दर रविवारी संग्राम चौक परिसरात आठवडी बाजार भरतो. यावेळी नागरिक, व्यापारी आणि वाहनांची मोठी गर्दी होते. शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गावरून ये-जा करावी लागते.

या धोकादायक रोहित्राबाबत स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता हे विद्युत रोहित्र तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. तोपर्यंत परिसरात संरक्षक कठडे आणि सूचना फलक लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आता तरी संबंधित वीज वितरण कंपनी आणि प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेणार का, की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार, असा सवाल कडावासीय उपस्थित करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *