जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठता येतात, हे यावलच्या कन्येने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील ऐतिहासिक कामगिरी आणि समाजाकडून मिळालेला नवदुर्गा पुरस्कार, अशा दुहेरी सन्मानामुळे प्रियंका किरण चौधरी यांनी यावल आणि अटरावल गावाचा अभिमान उंचावला आहे.
यावल येथील प्रियंका किरण चौधरी (देशमुख) यांना भोरगाव लेवा पाटील पंचायत, पाडळसे शाखा मुंबईतर्फे नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी समाजातील नऊ भगिनींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रियंका चौधरी सध्या मुंबई येथे वास्तव्यास असून त्या पदवीधर आहेत. त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे कार्यरत आहेत. जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
त्यांच्या यशातील सर्वात अभिमानास्पद कामगिरी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ अँड ऑफिसर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबईच्या जून २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीतील त्यांचा दैदिप्यमान विजय.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुख्यालय मुंबई, मुंबई क्षेत्रीय कार्यालय, बेलापूर, भायखळा, बीकेसी, अहमदाबाद, पुणे, पणजी आणि डब्ल्यूटीसी येथील सभासदांचा समावेश असलेल्या या निवडणुकीत तब्बल ५६ उमेदवारांमधून प्रियंका चौधरी यांनी सर्वाधिक मते मिळवून घवघवीत यश संपादन केले.
सोसायटीच्या १०० वर्षांच्या गौरवशाली इतिहासात आजवर कोणत्याही उमेदवाराला मिळाली नव्हती इतकी विक्रमी मते मिळवण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयामुळे रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे.
या निवडणुकीतून २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची रिझर्व्ह बँक वर्ल्ड ट्रेड सेंटर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अर्थात कार्यकारी संचालकपदी निवड झाली आहे. नवीन चेहरा असूनही सभासदांचा प्रचंड विश्वास संपादन करून मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीची, जिद्दीची आणि लोकांशी जोडलेल्या नात्यांची पावती मानली जात आहे.
केवळ कामाच्या क्षेत्रातच नव्हे, तर विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांमध्येही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे आयोजित व्हिजिलन्स अवेअरनेस उपक्रमांतर्गत दरवर्षी होणाऱ्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत त्यांनी क्रमांक पटकावला आहे. तसेच राजभाषा विभागातर्फे आयोजित हिंदी सुलेखन स्पर्धेतही त्यांनी यश मिळवले आहे. विविध स्लोगन स्पर्धांमध्ये प्रथम अथवा द्वितीय क्रमांक मिळवत त्यांनी आपल्या प्रतिभेची आणि कल्पकतेची छाप उमटवली आहे.
याशिवाय हिंदी दिन, मराठी दिन आणि जागरूकता सप्ताहानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, रांगोळी तसेच इतर उपक्रमांमध्ये त्या उत्स्फूर्त सहभाग घेतात.
त्यांच्या या विविधांगी कामगिरीची दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील क्षेत्रीय संचालक (Regional Director – RD) आणि मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager – CGM) यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
जिद्द असेल तर यशाला गवसणी घालता येते, मेहनत असेल तर स्वप्नांना वास्तवात उतरवता येते आणि लोकांचा विश्वास संपादन केला तर इतिहास घडवता येतो, हे प्रियंका किरण चौधरी यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.
त्या चेतन उमाकांत देशमुख यांच्या पत्नी, ज्योती किरण चौधरी यांच्या कन्या आणि चौधरी विजय चौधरी यांच्या पुतण्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे यावल आणि अटरावल गावाचा अभिमान उंचावला आहे.
रिझर्व्ह बँकेतील ऐतिहासिक विजय आणि समाजाकडून मिळालेला नवदुर्गा पुरस्कार, अशा दुहेरी सन्मानाने प्रियंका चौधरी यांनी यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यावल आणि अटरावल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
