एरंडोल शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने आता कंबर कसली आहे. प्रतिबंधित सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात नगरपरिषदेने धडक कारवाई करत तब्बल ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुख्य बाजारपेठेसह हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचीही तपासणी करण्यात आली.

‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत एरंडोल शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी एरंडोल नगरपरिषदेकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

या मोहिमेला गती देत नगरपरिषदेच्या विशेष पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणी प्रतिबंधित सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई केली. या तपासणी मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरात शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर होत असल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या पथकाने अचानक तपासणी मोहीम राबवली. यामध्ये शहरातील मुख्य मार्केट परिसर, पोलीस स्टेशनसमोरील खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि बसस्थानकाबाहेरील हॉटेल्सची सखोल तपासणी करण्यात आली.

या ठिकाणी सिंगल युज प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित विक्रेते आणि हॉटेल चालकांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी केली जात असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

व्यावसायिक आणि नागरिकांनी प्रतिबंधित सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा. दैनंदिन खरेदीसाठी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी किंवा पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार’ हा संदेश प्रत्यक्षात आणून प्लास्टिकमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

शहरातील प्लास्टिक बंदीची मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता यापुढेही अधिक तीव्रतेने राबवली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई सुरूच राहील, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.

एरंडोल शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेला नागरिक आणि व्यापाऱ्यांचा कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘आपला सहभाग, शहराचा अभिमान’ या ब्रीदवाक्यानुसार सर्वांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *