जळगाव ते मुंबई विमानसेवेचा वारंवार खोळंबा होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐनवेळी विमान रद्द केले जात असल्याने प्रवाशांची महत्त्वाची कामे रखडत असून, आता संबंधित विमान कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत सेवा सुधारण्यासह कंत्राट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जळगाव ते मुंबई विमानसेवा वारंवार रद्द होत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐनवेळी विमान रद्द होत असल्याने अनेक प्रवाशांची महत्त्वाची कामे खोळंबली आहेत.

१३ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव ते मुंबई प्रवासासाठी अलाईन्स एअर (Alliances Air) कंपनीचे सकाळी ९ वाजून २५ मिनिटांचे विमान तिकीट बुक करण्यात आले होते. मात्र, १२ ऑक्टोबर रोजी ऐनवेळी कंपनीकडून हे विमान रद्द करण्यात आले. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जाणे शक्य झाले नाही. तसेच जळगावहून प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना याचा फटका बसल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

या अचानक रद्द झालेल्या उड्डाणामुळे दवाखान्यात जाणारे रुग्ण वेळेवर पोहोचू शकले नाहीत. व्यापाऱ्यांना व्यापारासाठी वेळेत जाता आले नाही, तर नोकरदार कर्मचाऱ्यांना कामावर वेळेवर हजर राहता आले नाही. मुलाखतीसाठी किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या उमेदवारांचेही नुकसान झाले. अनेक प्रवाशांची महत्त्वाची कामे खोळंबली.

अलाईन्स एअर कंपनीने तातडीने सेवा सुधारावी आणि तिकीटाचे पैसे परत करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. सातत्याने उड्डाणे रद्द होत असल्यास जळगाव जिल्ह्यातील कंपनीचे कंत्राट रद्द करून सक्षम आणि वेळेवर सेवा देणाऱ्या दुसऱ्या विमान कंपनीला कंत्राट देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

तिकिटाचे पैसे दहा दिवसांत परत न मिळाल्यास स्वतः विमानतळावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचा इशाराही तक्रारदाराने दिला आहे.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अलाईन्स एअर कंपनीच्या कामकाजात तातडीने लक्ष घालून नियमित आणि विश्वासार्ह विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही कंपनीच्या अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याची ताकीद द्यावी. अन्यथा कंपनीचे कंत्राट रद्द करून सक्षम आणि विश्वासार्ह विमान कंपनीची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आता अलाईन्स एअर कंपनी या तक्रारीची दखल घेऊन विमानसेवा नियमित करणार का? प्रवाशांना वेळेवर सेवा आणि तिकिटांचे पैसे परत मिळणार का, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *