वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पुलगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुंजखेडा घाटाजवळ विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला असून, सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गुंजखेडा घाट परिसरात वर्धा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पुलगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला.

पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे आणि पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके यांच्यासह पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली.

यावेळी ट्रॅक्टरचालक रवींद्र उर्फ पाशा येसने याच्याकडे रेती उत्खनन आणि वाहतुकीचा परवाना मागितला असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. तसेच बबलू पठाण याने मजुरांच्या माध्यमातून वर्धा नदीपात्रातून रेती भरून दिल्याची माहिती ट्रॅक्टरचालकाने पोलिसांना दिली.

या कारवाईत महिंद्रा ५८५ डीआय ट्रॅक्टर, निळ्या रंगाची ट्रॉली आणि एक ब्रास काळी रेती असा एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी बबलू पठाण, ट्रॅक्टरचालक रवींद्र उर्फ पाशा येसने आणि ट्रॅक्टर मालक अशा तिघांविरुद्ध पुलगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके करीत आहेत.

विशेष म्हणजे, वर्धा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जावेद खान | एनटीव्ही न्यूज मराठी | पुलगाव, वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *