वडापावच्या पैशावरून हल्ला,दोघे जखमी, चौघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे वडापावचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चौघांनी दोघांना जातिवाचक शिवीगाळ करत चाकूने जीवघेणा हल्ला केला आणि जखमी केले. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी प्रवीण पारधे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीच्या हॉटेलमध्ये सचिन धोत्रे, गोट्या धोत्रे, ज्ञानदेव धोत्रे ,,सागर बोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यातील सचिन धोत्रे व गोट्या धोत्रे यांनी वडापावच्या टपरीमध्ये वडापाव खाल्ल्यानंतर तेथून जाऊ लागले. पारधे यांनी त्यांना वडापावचे पैसे मागितले. पैसे मागितल्याचा राग आल्याने त्यांनी पारधे यांना जातिवाचक शिवीगाळ करून तुझ्याकडे पाहतो असे म्हणून निघून गेले. त्यानंतर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी पारधे यांच्या टपरीमध्ये येऊन तू कशाचे पैसे मागतो, असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ केली. तुम्ही माझे काय वाकडे करणार असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सचिन धोत्रे याने पारधे यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. हा प्रकार सुरू असताना पारधे यांचा भाऊ बबन पारधे हा मध्ये आला.त्याच्यावरही चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव करत आहेत.