जळगाव जिल्ह्यातील यावल येथील महाजन इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधान वाचन, गीत, मानवी साखळी आणि आकर्षक प्रतिकृतीच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी लोकशाही मूल्यांचा संदेश दिला.

व्यास शिक्षण मंडळ संचलित महाजन इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेमी माध्यमाच्या प्राचार्या रंजना महाजन मॅडम होत्या. तसेच इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुवर्णा पाटील यांनी भारतीय संविधानाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.

प्रीती भार्गव आणि पुनम कोळंबे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी आपले विचार व्यक्त केले. सातवी इंग्लिश माध्यम आणि पाचवी सेमी माध्यमातील विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी सुंदर गीत सादर केले.

यावेळी सेमी आणि इंग्लिश माध्यमातील नववीच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून संविधानाविषयी घोषणा दिल्या. तसेच दोन्ही माध्यमांतील चौथी, पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘२६/११/१९४९’ असे शब्द साकारत संविधान दिनाची सुंदर प्रतिकृती तयार केली.

कार्यक्रमात इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संविधानाविषयी मार्गदर्शन केले. शाळेच्या सुपरवायझर गौरी भिरुड मॅडम आणि राजश्री लोखंडे मॅडम यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा पाटील यांनी केले, तर अर्चना पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. अशा प्रकारे विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाजन इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *