मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी किनगाव येथील स्मारक समितीने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आता या लढ्याला नंदुरबारच्या संभाजी ब्रिगेडनेही जाहीर पाठिंबा दिला असून, ५ जानेवारीच्या उपोषणात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी किनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने लढा सुरू आहे. यासंदर्भात समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदने दिली; मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.
यामुळे समितीने ५ जानेवारी रोजी किनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांना लेखी पत्रही देण्यात आले आहे.
या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नंदुरबार येथील संभाजी ब्रिगेड संघटनेने जाहीर भूमिका घेतली आहे. स्मारक समितीच्या या लढ्यात संभाजी ब्रिगेडही सहभागी होणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
