दुष्काळी शेवगाव-पाथर्डी भागातील शेतकऱ्यांसाठी ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळाली आहे. योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी निधी आणि तिसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

महायुती सरकारच्या माध्यमातून ताजनापूर उपसा सिंचन योजनेचा तिसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्नशील राहील आणि दुष्काळी भागातील गावांना न्याय देईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी आमदार मोनिका राजळे, अजय रक्ताटे आणि लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या पुनरुज्जीवनासाठी यांत्रिकी, विद्युत आणि स्थापत्य कामांसाठी २० कोटी ८८ लाख रुपये, तर तिसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणासाठी ६३ लाख रुपयांच्या निधीला मंत्रालयातील बैठकीत मान्यता देण्यात आली.

आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करून भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी आभार मानले. या योजनेमुळे आठ गावांतील सुमारे २ हजार ७४४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून, विस्तारित पहिल्या टप्प्यात १३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या प्रयत्नांत ताजनापूर योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विखे पाटील म्हणाले. हा टप्पा शेवगाव-पाथर्डी तालुक्यांसाठी ऐतिहासिक ठरणार असून, दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या ४६ गावांच्या पाणी प्रश्नावर नागपूर अधिवेशनादरम्यान बैठक घेणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

शेवगाव येथील टंचाई आढावा बैठकीत तिसऱ्या टप्प्याच्या कामाबाबत दिलेल्या आश्वासनाची प्रशासकीय स्तरावर काही महिन्यांत कार्यवाही सुरू झाल्याने, शब्दपूर्ती होणार असल्याचा ठाम विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *