विस्तारित एमआयडीसी संदर्भात उबाठा सेनेने केलेल्या आरोपांवर सातबारे जाहीर करा, नावे जाहीर करा असे आव्हान आपण केले होते. परंतु पाच दिवस झाले, आतापर्यंत उत्तर दिले नाही. यावरून खोटे आरोप करून महायुतीच्या विकास कामाला आणि जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक देण्याचा प्रयत्न, षडयंत्र असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर व माजी नगरसेवक अनिल मुरुमकर यांनी केला.

राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर तसेच अकोल्यातील उद्योजक, युवकांची मागणी लक्षात घेऊन अकोला जिल्ह्याच्या उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने बोरगाव मंजू पर्यंत एमआयडीसी विस्तारित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला आणि शासनाच्या उच्चस्तरीय समितीने तो प्रस्ताव पास केल्यानंतर वृत्तपत्रात बातम्या आल्यानंतर विकास कामाला सातत्याने विरोध करणाऱ्या नेत्यांनी एका लोकप्रतिनिधींची २५० एकर जमीन असल्याचा आरोप केला.

लोकप्रतिनिधी व सातबारे जनतेसमोर मांडा, अन्यथा अकोला जिल्ह्यातील तमाम नागरिकांची माफी मागावी अशी मागणी केली होती. परंतु पाच-सहा दिवस लोटल्यावर सुद्धा एकही उच्चार आणि पुरावा उबाठा सेना देऊ शकली नाही. त्यांचे सल्लागार सुद्धा यावर एक शब्द बोलले नाहीत. यावरून त्यांचे वक्तव्य खोटे होते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील तमाम नागरिकांची माफी मागावी व विकास कामाला विरोध करण्याचे काम त्यांनी बंद करावे, असे आव्हान जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *