१६ ते २२ जलजागृती सप्ताह,चुलबंद प्रकल्पावर जल पूजन,सप्ताहभर विविध कार्यक्रम…
गोंदिया : पाणी हे जीवन असून पाण्याची बचत ही काळाची गरज आहे. दिवसेंदिवस पाण्याची कमतरता जाणवत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने १६ ते २२ मार्च दरम्यान जल जागृती सप्ताह राबविण्याच्या सूचना दिल्या आहे. या सप्ताहात यंत्रणेसह नागरिकांनी पाणी बचतीचे महत्त्व समजून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले.
गोंदिया पाटबंधारे विभागाच्या वतीने १६ ते २२ मार्च या दरम्यान जिल्हाभर जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला अधीक्षक अभियंता र. ग. पराते, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग सोनाली सोनुले, कार्यकारी अभियंता श्री. कुऱ्हेकर, कार्यकारी अभियंता श्री. पाटील. कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद श्री. राऊत, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा सुमित बेलपत्रे उपस्थित होते.
अलीकडच्या काळात पावसाची टक्केवारी कमी झाली असून राज्यातील अनेक भागात डिसेंबर पासूनच पाणी टंचाई भासू लागते आहे. आपल्यात अजूनही म्हणावी तशी जल साक्षरता नाही. प्रत्येकाने पाण्याचे योग्य नियोजन केल्यास भर उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाईची तीव्रता कमी करता येते. ही बाब जलजागृती सप्ताहात नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. केवळ कार्यक्रमाचा सोपस्कार न करता पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा याबाबत नागरिकांत जागृती करावी असे त्यांनी सांगितले.१६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता चुलबंद मध्यम प्रकल्प गोरेगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जल पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर जल बचतीची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. जलजागृती सप्ताहातील हा मुख्य कार्यक्रम असणार आहे. पीक फेरबदल बाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाने शाळा शाळांमधून जल प्रतिज्ञा वाचन, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला, घोषवाक्य स्पर्धा, जल प्रभात फेरीचे आयोजन करावे असे यावेळी ठरविण्यात आले.जलसंधारण विभाग, लघू पाटबंधारे विभाग, पाणी व स्वच्छता मिशन यांनी पाणी बचतीचे महत्त्व विशद करणाऱ्या कार्यक्रमाचे सप्ताहभर आयोजन करण्यात येणार आहे. गोंदिया पाटबंधारे विभागाच्या वतीने २१ मार्च रोजी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही प्रभात फेरी गोंदिया शहरात नेहरू चौक, ते गोरेलाल चौक ते गांधी प्रतिमा ते जयस्तंभ चौक व परत नेहरू चौक या दरम्यान काढण्यात येणार आहे. या प्रभात फेरीच्या माध्यमातून जल बचतीचा संदेश देण्यात येणार आहे.२२ मार्च रोजी नवेगाव बांध लघू प्रकल्प अर्जुनी मोरगाव येथे सकाळी ११ ते ०२ या दरम्यान जल साक्षरता मोहीम व प्रगतशील शेतकरी या विषयावर आयोजित कार्यशाळेत या सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. या सप्ताहात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन पाणी बचतीचे महत्त्व घराघरात पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.