पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे मत

पुणे : जेव्हा आपण वाईट वागतो, आपल्या जीवनामध्ये वाईट विचार येतात तेव्हा निश्चितपणे कोठेतरी कमतरता निर्माण झालेली असते असे मत पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी विठ्ठलवाडी ता.शिरूर येथे व्यक्त केले.
शिरूर तालुक्यातील श्री.क्षेत्र विठ्ठलवाडी येथे गेल्या दहा वर्षांपासून राबविल्या जाणा-या गणेश विसर्जन निर्माल्य संकलन ,होडीतून नदीपात्रात गणरायाचे विसर्जन या उपक्रमाची पाहणी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख ,पोलीस उप अधिक्षक यशवंत गवारी यांनी केली. यावेळी डॉ.अभिनव देशमुख बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ.अभिनव देशमुख म्हणाले, या गावामध्ये जी आतापर्यंतची परंपरा आहे ती जपली आहे. निर्माल्य संकलन करून आपण या गावाचं,नदीचं प्रदुषण होण्यापासून जपतं आहात. ही नदी स्वच्छ ठेवणं, पवित्र ठेवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हा उत्सव,सण साजरा करत असताना पर्यावरणाचं भान आपण राखत आहात. पंचक्रोशीतील सगळ्या गावांना नवीन आदर्श आपण घालून दिलेला आहे.गणेशाचं जे आगमन असतं, गणेशाची प्रतिष्ठापणा करणे, विसर्जन करणे तेव्हा गणेश आपल्या सर्वांच्या मनामध्ये असतो. आपण जेव्हा चांगलं वागतो आपण जेव्हा सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्या मनामध्ये असतो.आमचं काम असते ते तुमच्या सपोर्टवर असते आपलं असचं सहकार्य पोलीस प्रशासनाला देत राहावे अशी अपेक्षा पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील प्रा.संदीप गवारे, प्रा.प्रवीणकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षांपासून गणेश निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला जात असून साधारण साडेआठशे किलो निर्माल्य निर्मलित करण्यात येवून विघटनासाठी जमिनीत काढण्यात आले. बोटींमधून गणपती विसर्जन करण्यास मदत करणा-या चंद्रकांत गवारणे ,बाळासाहेब गोंडावळे, गणेश आंबेकर या स्वयंसेवकांचा सत्कार यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या हस्ते, पुणे जिल्हा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *