पुणे : निरा ता. पुरंदर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे सहशिक्षक विनय तांबे यांना पुरंदर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरंदर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी घोगरे, सचिव मधुकर जगताप यांनी निरा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे सहशिक्षक विनय तांबे यांना कळविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण गेली अनेक वर्षे पुरंदर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहात. आपल्या हातून अनेक विद्यार्थी घडविले गेले आहेत. हे विद्यार्थी समाजाची व देशाची सेवा करीत असताना त्यांच्यामध्ये आपल्या मार्गदर्शनाचा ठसा जाणवला.
आपण केलेल्या या पवित्र कार्याची दखल घेवून पुरंदर तालुका माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने आपणास तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करताना मनस्वी आनंद होत आहे असे पत्रात म्हटले असून यापुढील काळातही आपल्या हातून अनेक विद्यार्थी घडावेत व समर्थ भारत घडविण्यासाठी आपले योगदान लाभावे अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली आहे.
