अतिथी देवो भव:, भारतीय संस्कृतीचे अमोल परंपरा : आगमन होताच पाहुण्यांवर झाला फुलांचा वर्षाव
औरंगाबाद : जी-२० व डब्लू २० परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला भेट दिली. शिष्टमंडळात असणाऱ्या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून अक्षरशः भारावून गेल्या. शिष्टमंडळ वेरुळ लेणीला भेट देणार असल्या कारणाने संपूर्ण लेणी परिसर हा सुशोभिकरणामुळे अधिकच सुंदर दिसत होता. तर लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान रांगोळी काढल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य खुलले होते.तीन वातानुकूलित बसेसमधून संध्याकाळी 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास लेणीच्या पायथ्याशी महिला पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर नऊवारी नेसलेल्या तरुणींनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांना गुलाब पुष्प भेट दिले. लेणीपर्यंत जाण्यासाठी लाल कार्पेट अंथरलेले होते. पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले. मुख्य लेणीच्या परिसरात आल्या नंतर लेणीचे सौंदर्य पाहून सर्व भरावून गेल्या.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी येथे जी-20 (W-20) शिष्टमंडळाने भेट दिली. लेण्यांची पाहणी करत कैलास लेणी आणि कोरलेल्या विविध लेण्यांच्या शिल्पकला व कलाकुसर आदींचे कौतुकही शिष्टमंडळाने केले. तसेच वेरूळ लेण्या पाहून शिष्टमंडळाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होते. शिष्टमंडळाचे भारतीय संस्कृतिक पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. पाहणी दरम्यान विविध देशांच्या प्रतिनिधींना त्यांच्या भाषेत जगप्रसिद्ध वेरूळ लेणीबाबत सविस्तर माहिती गाईड यांनी दिली. माहिती ऐकून व कलेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तत्कालीन कलाकृती निर्मितीबद्दल आश्चर्यही शिष्टमंडळाने व्यक्त केले.
G20 राष्ट्रगटात भारता शिवाय अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका अशा 19 देशांचा समावेश आहे युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य असून या सर्व देशांच्या प्रतिनिधींनी ई बस मध्ये भ्रमण करून जगप्रसिद्ध वेरुळ लेणीची पाहणी केली.
या भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या अभ्यागत केंद्रास भेट दिली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अभ्यागत केंद्राची सविस्तर माहिती घेतली . G20 परिषदेत येणारे शिष्टमंडळ येथे भेट दिली असून या ठिकाणी त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक बाजूची ओळख करून देण्यात आली.तसेच त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि वेरुळच्या ऐतिहासिक बाजूची ओळख करून देण्यात आली.अभ्यागत केंद्रामध्ये असलेल्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले . त्याचबरोबर या ठिकाणी पाहुण्याच्या जेवणासाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीने व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, विस्तार अधिकारी एच बी कहाटे, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, दीपक हरणे, पुरातत्त्व विभागाचे संवर्धन सहायक राजेश वाकलेकर, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घरमोडे आदींचीही यावेळी उपस्थिती होती. या प्रसंगी ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ पासुनच चोख पोलिस बंदोबस्त लवण्यात आला असून ते स्वतः येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना वाहतुकी विषयी कुठलाही त्रास न व्हावा म्हणून खबरदारी घेत तळ ठोकून होते.