उमरखेड –
“बाह्य अवडंबर माजविण्यापेक्षा एकमेकांचे विचार व साहित्याची देवाण घेवाण झाली पाहिजे. त्यामुळे एकमेकांविषयीच्या गैरसमजुती दूर होऊन ख-या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित होऊ शकते,” असे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार माननीय नौशाद उस्मान (औरंगाबाद) यांनी केले. जमाअत ए इस्लामी हिंदच्या स्थानिक शाखेतर्फे आयोजित येथील अनुरत्ना हाॅटेलमध्ये सर्व धर्मियांसाठी आयोजित ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
समाजात जातीय सलोखा राहावा आणि परस्पर सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी जमाअत ए इस्लामी हिंदच्या स्थानिक शाखेने या ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात मोठ्या संख्येने शहरातील बुद्धिजीवी, पत्रकार, सामाजिक विचारवंत व नागरिक उपस्थित होते.
देशातील एकंदर वातावरणाचा आढावा घेत प्रमुख पाहुणे नौशाद उस्मान यांनी सांगितले की, “एखाद्या मराठा नेत्याने इफ्तार पार्टीत जाळीदार टोपी घालून एखाद्याला खजुर भरवायचा किंवा एखाद्या मुसलमानानं एखाद्या ठिकाणी पूजा केली म्हणजे झाली एकात्मता, असे नव्हे तर ख-या अर्थाने मनोमिलन होण्यासाठी एकमेकांचे विचार व साहित्याची देवाण घेवाण झाली पाहिजे. तरच राष्ट्रीय एकात्मता शक्य आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात रिजवान खान यांनी केलेल्या क़ुरआन पठनाने झाली. मुव्हमेंट फाॅर पीस & जस्टीस (MPJ) चे स्थानिक अध्यक्ष मा. फिरोज़ अंसारी यांनी प्रास्ताविक केले.मो .खालीद यांनी सुत्रसंचलन तर जमाअतचे स्थानिक अध्यक्ष मा. जहिर क़ाज़ी यांनी शेवटी आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्वांनी शिरखुर्म्यासह सरूची जेवणाचा आस्वाद घेतला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *