तहसील कार्यालय उमरगा येथे उमरगा तालुक्यातील महावितरण, कृषी, पशसंवर्धन, आरोग्य, पाणीपुरवठा आदी विभागांची आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व युवानेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीत उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील कालच्या पावसामुळे विस्कळीत झालेला वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा व उमरगा शहरातील वारंवार खंडित होत असलेला वीज पुरवठा याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन महावितरणच्या शहरातील प्रमुख समस्या तातडीने सोडवणे बाबत सूचना केल्या. याबाबत महावितरणचे अधिकाऱ्याकडून शहरातील विद्युत वाहिन्या खूप वर्षाखालील असल्याने वारंवार खंडित होत असल्याचे सांगण्यात आले. त्याअनुषगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शहरासाठी नवीन उपविभागीय अभियंता कार्यालय, सबस्टेशन, रोहीत्र, विद्युत वाहिन्या व कमकुवत झालेले पोल बदलण्यासाठी विशेष प्रस्ताव तयार करून सादर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. विशेष म्हणजे लाईट गेल्यानंतर शहरातील विद्युत विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार चौगुले या विषयावरती आक्रमक झाल्याचे दिसले.
आरोग्य विभागांकडून गरोधर महीला व लहान बाळ यांच्यासाठी सुरु करण्यात आलेल्या 102 या नवीन अंबुलन्सचा नागरिकांमध्ये प्रचार/प्रसार करणे व पावसाळ्याच्या अनुषंगाने साथीच्या आजाराला लागणारे सर्व औषधे मुबलक प्रमाणात ठेवणे, औषधे नसतील तर त्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करणे,कृषी विभागात संदर्भात खरिपाच्या पेरणीच्या अनुषंगाने खतांचे व बियाण्यांचे विक्री सुरू असुन ती विक्री सर्व दुकानांमध्ये शासनमान्य दराप्रमाणे होत आहे का नाही. यावरती लक्ष ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या व तालुक्यातील सर्व गावांमध्ये जमिनीच्या टेस्ट लेवल कऱण्यात यावे व बीज प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यात यावी.
छोट्या मोठ्या जनावरांचे लसीकरण तात्काळ पूर्ण करून घ्यावे व रोगराईने कुठलीही जनावरे दगावणार नाहीत. याबाबत दक्षता घ्यावी व त्याबाबत आवश्यक ती अंमलबजावणी करावी. जनावरांसाठी लागणाऱ्या औषधांचा साठा मुबलक प्रमाणात ठेवावा. विज पडून जनावरे दगावल्यास त्याचा पंचनामा तात्काळ करून सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
केंद्राच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सुरू असलेले पाणीपुरवठ्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे व महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामीण भागात रस्ते व विहिरींचे काम तात्काळ पूर्ण करून घेणे. तालुक्यातील अनेक ठिकाणच्या कबाल्यांचे प्रश्न प्रलंबित असून हे प्रश्न तात्काळ मार्गी लावून नागरिकांना कबाल्यांचे वाटप करण्यात यावे. तहसील कार्यालय उमरगा येथे कंट्रोल रूम सुरू करणेबाबत व आदी विषयांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार चौगुले यांनी सूचना केल्या.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी गणेश पवार,तहसीलदार गोविंद येरमे,शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, नायब तहसीलदार रतन काजळे, पशुसंवर्धन उपविभागीय अधिकारी डॉ.बिराजदार, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.विनोद जाधव, कृषी अधिकारी रितापुरे, सा.बां.उपविभागाचे बिराजदार, महावितरणचे अभियंता जयंत जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कनिष्ठ अभियंता, शिवसेना शहर प्रमुख योगेश तपसाळे, विधानसभा संघटक शरद पवार, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, संदीप जगताप व तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.