सचिन बिद्री,उमरगा
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक प्रा सुरेश दाजी बिराजदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून चर्चिली जात आहे . यासाठीच्या हालचालींना वेग आला असून जुलै महिन्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांमध्ये बिराजदार यांची निवड होण्याची शक्यता आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधान परिषदेच्या तीन जागा , तर राज्यसभेच्या दोन जागा येत आहेत त्यात विधान परिषदेच्या तीन जागांपैकी एका जागेवर धाराशिव येथील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुरेश दाजी बिराजदार यांना विधान परिषदेवर संधी देण्याची घोषणा केली होती . धाराशिव लोकसभेसाठी अजित पवार यांनी सुरेश बिराजदार यांना तयारी करण्याची सूचना देत सहा महिन्यापूर्वीच कामाला लावले होते त्यानुसार बिराजदार यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता व जोरात तयारीही केली होती पण राजकीय घडामोडीत सदरील जगा आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना देण्यात आल्याने श्री . बिराजदार यांना थांबण्यास सांगण्यात आले दादांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी पक्षाचे एकनिष्ठ पणे कामही केले . पण त्यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी अजितदादांनी भर सभेत विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता . मागील ४० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ट असलेल्या कै आ .भाऊसाहेब बिराजदार यांचा राजकीय वारसा समर्थपणे चालवणाऱ्या तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादींवर आलेल्या संकट समयी खंबीरपणे पक्षाशी साथ देत पक्षाला उभारी देणाऱ्या सुरेश दाजी बिराजदार यांना संधी मिळणार आहे .

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुका तसेच परिसरातील भागामध्ये सातत्याने कोरडा आणि ओल्या दुष्काळाचे संकट कायम घोंगावत असते . तीस वर्षांपूर्वी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाने येथील शेतकरी नागरिक प्रगतीपासून वंचित राहिलेला आहे . हा भाग राष्ट्रवादी विचारधारेला मानणारा असूनही विधानसभा आरक्षित असल्याने बिराजदार यांची अडचण झाली होती . श्री बिराजदार यांनी अडचणीत आलेली जिल्हा बँक वाचवण्यासाठी केलेला यशस्वी प्रयत्न, धाराशिव जिल्ह्यामध्ये बेरोजगार व्यवसायिक यांच्यासाठी उभारलेले भाऊसाहेब बिराजदार बँक तसेच समुद्राळ येथे उभारलेला भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना यामुळे चार तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणारा मोठा फायदा व पक्ष अडचणीत असताना पक्षाची घेतलेली जबाबदारी समर्थपणे पार पडल्याने या सर्व बाबींचा सारासार विचार केला असता श्री सुरेश बिराजदार यांना संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे .