कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे वातावरण

फुलचंद भगत
वाशिम – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डाॅ.सिध्दार्थ देवळे यांनी वंचितला बाय बाय केल्याने राजकीय क्षेञात मोठी खळबळ ऊडाली असुन कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.हा राजकीय डाव तर नाही ना? अशा शंका आता राजकीय वर्तुळातुन काढल्या जात आहेत.गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहूजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ प्रदेश अध्यक्ष पदाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळत असतांना डॉ. सिध्दार्थ देवळे यांनी अचानक आपल्या पक्ष सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा दिल्याने पक्षातील त्यांच्या चाहत्या वर्गासह अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच डॉ. देवळे यांच्या निर्णयामुळे वाशिम मंगरुळपीर विधानसभा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
वाशिम मंगरुळपीर विधानसभा क्षेञात राजकारणात मोठी खबळजनक घटना घडली असुन दि.८ ऑगष्ट रोजी डॉ. देवळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे पाठविल्यानंतर वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी हा राजीनामा त्वरीत स्विकारला असून त्यांना विदर्भ प्रदेश अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मूक्त केले आहे. याबाबत डॉ. देवळे यांना उलटटपाली पाठविलेल्या पत्रात रेखा ठाकूर यांनी म्हटले आहे की, आपण गेल्या आपण गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत होतात. त्याचे फोटो सोशल मिडीयावर प्रसिध्द होत होते. आपण महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही कानावर येत आहेत. त्यामुळे आपण वंचित बहूजन आघाडीचा पक्ष सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा दिला आहे हे पक्षाच्या लक्षात आले आहे. वंचित बहूजन आघाडीने मागील विधानसभेत तुम्हाला उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर पश्चिम विदर्भ अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. पक्षाने तुमचा सन्मानचा केला होता. परंतु तरीदेखील आपण समाधानी झाला नाहीत. आपणास एवढेच सांगु इच्छिते की, वंचित बहूजन आघाडीने जो सन्मान तुम्हाला दिला तो अन्य पक्षात मिळणार नाही हे लक्षात घ्या असे डॉ. देवळे यांना पाठविलेल्या पत्रात रेखा ठाकूर यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात सतत योगदान देवून कार्यरत राहणारे येथील हृदयरोग तज्ञ डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची पक्षाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहूजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. देवळे यांनी वाशिम येथे सन २००६ मध्ये वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. योग्य निदान व यशस्वी उपचारामुळे ते अल्पावधीतच जिल्ह्यासह परिसरात परिचीत झाले. समाजसेवेची आवड असल्याने ते वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्राशी जोडल्या गेले. मागील जि.प. निवडणूकीत त्यांनी वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारासाठी जिल्हाभर प्रवास करुन उमेदवारांना बळ दिले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा विचार गावपातळीवर पोहचविण्यासोबतच संघटन मजबुत करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ऑक्टोंबर २०१९ मध्ये त्यांनी वंचित बहूजन आघाडीच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवून दुसर्‍या क्रमांकाची मते मिळविली होती. या निवडणूकीत त्यांना प्रचारासाठी अल्पसा वेळ मिळाल्याने त्यांचा पराभव झाला होता. मात्र समोर असलेल्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी चांगलीच टक्कर देवून मोठी मते मिळविली होती. निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ पक्षाच्या वाढीसाठी व संघटन मजबुतीसाठी स्वत:ला झोकून दिले होते. पश्चिम विदर्भ प्रदेश अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळतांना त्यांनी वाशिम जिल्ह्यात आपली सामाजीक आणि राजकीय वाटचाल समांतर अशी ठेवली. त्यामुळे त्यांच्या चाहत्या वर्गात दिवसेंदिवस भरच पडली. मात्र त्यांची वाढती प्रसिध्दी विरोधकांना खटकत होती.
याही वेळेस वाशिम विधानसभा मतदार संघातुन डॉ. सिध्दार्थ देवळे हे वंचित बहूजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगत असतांना डॉ. देवळे यांनीही त्यादृष्टीने तयारीत करत प्रचारकार्याची मोट बांधली होती. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात होत्या. मात्र या विधानसभा क्षेत्रात डॉ. देवळे यांना वगळून इतर उमेदवाराला वंचितचे तिकीट मिळणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगत आहेत. त्यातच डॉ. देवळे यांच्या नावाचा विरोध असणार्‍यांकडून पक्षातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे कान ऐनकेन प्रकारे भरल्या जात असल्याच्या चर्चाही त्यांच्या चाहत्या वर्गाकडून ऐकल्या जात होत्या. मात्र ८ ऑगष्ट रोजी अचानक डॉ. देवळे यांनी वंचितच्या पदाचा राजीनामा दिल्याने पुढील निवडणूकीत याचे परिणाम दिसून येतील असा राजकीय क्षेत्रातील तज्ञांचा कयास आहे. तसेच पक्षापासून डॉ. देवळे दुर झाल्याने येत्या विधानसभा निवडणूकीत वंचित ला डॉ. देवळे यांच्या निर्णयापासून फायदा होईल की नुकसान होईल? तसेच येत्या काही दिवसात डॉ. देवळे पुढील काय राजकीय निर्णय घेतात ? आदी प्रश्न मतदारांच्या मनात घर करत आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *