शेवगाव :  शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे तीन आरोपी शेवगाव पोलिसांनी आज सापळा लावून जेरबंद केले. सुनील बाबासाहेब पुरी, बाबासाहेब गोरक्षनाथ पुरी (दोघे रा. रावतळे कुरुडगाव, ता.शेवगाव) व शिवाजी कचरु वंजारी (रा.नजिक बाभुळगाव, ता.शेवगाव) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

एपी ट्रेडींग सोल्युशन नावाच्या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीने २७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार संजय जोशी यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला होता. तसेच तक्रारदार सुभाष आंधळे यांच्या फिर्यादीवरुन वेल्थमेकर ट्रेडिंग कंपनीने २८ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दोन गुन्ह्यात एकुण पाच आरोपींविरुध्द ५५ लाख ५० हजार रुपयांची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी तीन पोलीस पथके शेवगाव, पैठण, नगर, बीड, पुणे येथे रवाना केले होते. या पोलीस पथकाने आरोपींना पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) व गेवराई (जि. बीड) येथून पळुन जात असतांना सापळा लावुन शिताफीने पकडले. जेरबंद आरोपींना आज (ता. १०) शेवगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडीचे आदेश दिले. अन्य आरोपींना तांत्रिक विश्लेषनाच्या सहाय्याने लवकर अटक करण्यात येणार असुन पसार आरोपींचा पोलीस पथके शोध घेत आहेत.