नैतिकमूल्याची घसरण, व्यसनाधिनता या सारख्या कारणांमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. तरुणांच्या हातामध्ये बेड्या पडत आहेत. समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये आहे. जीवन जगत असताना इतरांच्या दुःख, वेदना समजावून त्या कमी केल्यास निकोप आणि सुदृढ समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरणाच्या जिल्हा सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.


छत्रपती शिवाजीमहाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात कायदे विषयक जागृती शिबिर आयोजित केले होते. प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे अध्यक्षस्थानी होते. न्यायाधीश पाटील म्हणाल्या, ”संतांच्या प्रबोधनामुळे समाजाला दिशा मिळत होती. संत तुकाराम महाराजांनी ‘ वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे’ असे सांगून पर्यावरण संवर्धनाचे महlत्त्व सांगितले. आता वृक्षतोडीला प्रतिबंध करण्यासाठी कायदे करावे लागत आहेत. समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे करून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी लागते. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. त्यामुळे आपल्या हातून कोणताही गुन्हा घडणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.