बदलापूर घटनेचा निषेध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडक्या बहिण योजनेच्या संदर्भ देत राज्य सरकारवर टीका केली आहे. बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करा, अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

बदलापूर घटनेत अनेक खुलासे बाहेर आले आहेत. वैद्यकीय अहवाल आलेला असतानाही गुन्हा दाखल करण्यास विलंब होणं, पीडितेच्या गरोदर आईला १० तासांहून अधिक काळ वाट पाहायला लावणं, अशा अनेक कारणांमुळे बदलापूरमध्ये संतप्त लोक रस्त्यांवर उतरले होते. या संतप्त जमावाने रेल रोको आंदोलन केले. जवळपास १० तासांहून अधिक काळ बदलापूरनंतरच्या लोकल बंद होत्या. या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी सोशलमिडीयावर पोस्ट करून सरकारला धारेवर धरलं आहे.“बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.”

“मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.”“आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?”“जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.”