सध्या शैक्षणिक प्रवेशाची लगबग सुरू आहे. त्यामुळे डिजिटल जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्याची विद्यार्थ्यांना आवश्यकता भासत आहे. महाऑनलाईन प्रणालीद्वारा वितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस ठाण्यात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी जोडलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून महाऑनलाईन प्रणालीद्वारा डिजिटल जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येते. डिजिटल वितरीत करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून अनधिकृत खोटा दाखला वितरीत केल्या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाणे येथे सेतूचालक विशाल नागेश दवंगे (रा. कोपरगाव) याच्या विरुद्ध तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात येथे सेतूचालक विश्वेश्वर द्वारकानाथ बागले (रा. कोपरगाव) आतिश भाऊसाहेब गवळी (रा. मढी ता. कोपरगाव) व सुनील लक्ष्मण शिंदे (रा. काकडी ता. कोपरगाव) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यांमध्ये अधिकारी यांचे नावाचा व पदनामाचा गैरवापर, मुळ दस्ताऐवजमध्ये खाडाखोड करून खोटे दस्ताऐवज तयार करणे, शासनाची दिशाभूल करणे, राजमुद्रेचा गैरवापर करणे, शासकीय लोगोचा गैरवापर करणे, शासनाची प्रतिमा मलिन करणे या संदर्भातील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.