भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू आहे. देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसीत भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.


जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीअल पार्क येथे देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. मोदी म्हणाले, ”लखपती दीदी योजना ही महत्वपूर्ण आहे. मागील एक महिन्यात ११ लाख दीदी लखपती बनल्या. यात १ लाख दीदी महाराष्ट्रातील आहेत. त्यासाठी राज्य शासनही पुढाकार घेत आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे. लखपती दीदी हे संपूर्ण परिवाराला सशक्त बनविण्याचे अभियान आहे. महिला लखपती दीदी बनने हे संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.