जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ८४ ग्रामपंचायतींच्या रिक्त असणार्‍या १५५ जागांच्या निवडणुका लांबवणीवर पडणार आहेत. निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हा प्रशासनास तोंडी सूचना देत आता विधानसभा निवडणुकीनंतर या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.


मागील महिन्यांत जिल्ह्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायत आणि १५५ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. अकोले तालुक्यात सर्वाधिक ६९ सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर शेवगाव १९, संगमनेर १४ आणि नेवासे दहा, तर उर्वरित जागांसाठी इतर तालुक्यांतील सदस्यांचा समावेश आहे. लांबलेल्या ८४ ग्रामपंचायतींसाठी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. जुलै महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ही लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीवर आधारीत होती. आता विधानसभा निवडणुकीनंतर होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नव्याने विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीनुसार नव्याने प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.