भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत बेताल वक्तव्य केले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे, असा आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केला आहे.

दिल्ली येथे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाले. हे आंदोलन चीनने घडवून आणले होते. या आंदोलनाच्या आडून देशात बांगलादेश घडवण्याचे षड्यंत्र होते, अशा प्रकारचे बेताल वक्तव्य भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी केले हाेते. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी संतप्त झाले आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या ६०० पेक्षा जास्त शेतकरी शहिदांचा, आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शेतकरी माता भगिनींचा व देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा हा घोर अपमान आहे, असे शेतकरी नेते नवले म्हणाले.
