विनायकराव पाटील यांना जीवनगौरव, सुरेशदाजी बिराजदार यांना सहकाररत्न,धम्मचारी प्रज्ञाजीत यांना समाजरत्न तर अय्यूब कादरी यांना पत्रकाररत्न.

कृषी, ग्रंथसेवा, उद्योग, शिक्षण, वाचन, क्रिडा इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींचाही समावेश.
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुळज, ता. उमरगा येथे दि. १६ डिसेंबर, २०१८ रोजी वाचनालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर वाचनालयाच्या उमरगा व लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागात १३ शाखा सुरु करण्यात आल्या.

तसेच ‘पान टपरी नव्हे, ज्ञान टपरी’ असे घोषवाक्य घेवून उमरगा शहरात ‘वाचन टपरी’चीही स्थापना केली गेली. शहरात दोन ठिकाणी वाचन कट्टेही चालवण्यात येतात. वाचनालयाच्या वतीने उमरगा-लोहारा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. पुरस्कार वितरणाचे हे सहावे वर्ष आहे.

शुक्रवार दि.०६ सप्टेंबर रोजी प्रा. शामराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी वाचनालयाच्या उमरगा शाखेत प्रा. चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन सन २०२४ च्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे जाहीर करण्यात आली.

यंदा श्रमजिवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

तसेच भाऊसाहेब बिराजदार सहकारी बॅंकेचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या सहकार क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांना सहकाररत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

बहुजन हिताय वसतीगृहाचे व्यवस्थापक धम्मचारी प्रज्ञाजीत यांना समाजरत्न, गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले दाबका येथील अय्यूब कादरी यांना पत्रकाररत्न, उमरगा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकांत भराटे यांना उत्कृष्ट वाचक, उमरगा येथील मुकबधीर विद्यालयात कार्य करणाऱ्या भावना नान्नजकर यांना शिक्षकरत्न, लोहारा तालुक्यातील काष्टी (खु.) येथे गेल्या अनेक वर्षांपासून वाचनालय चालवणाऱ्या कस्तुरबाई चव्हाण यांना ग्रंथसेवा, बलसूर येथील प्रगतशील शेतकरी नारायण गोपा चव्हाण यांना कृषीरत्न, उमरगा येथील व्यापारी शिवप्रसाद लड्डा यांना उद्योगरत्न तर मुरुम येथील अर्जूव व आर्यन तानाजी बिराजदार या बॅडमिंटनपटूंना क्रिडारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पुरस्कारांचे वितरण डिसेंबर महिन्यात केले जाईल असे वाचनालयाचे संस्थापक ॲड. शीतल चव्हाण यांनी सांगितले.

याप्रसंगी शांताबाई चव्हाण, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, अनुराधा पाटील, राजू बटगिरे, ॲड. ख्वाजा शेख, ॲड. अर्चनाताई पाटील, प्रदिप चौधरी, करीम शेख, किशोर औरादे, धानय्या स्वामी, प्रदिप मोरे, किशोर बसगुंडे, बबिता मदने, संतोष चव्हाण, माधव चव्हाण आदींची उपस्थिती होती.सर्वांनी प्रा. चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करुन, त्यांच्या स्मृतीस अभिवादन करुन पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
