उदगीर / प्रतिनिधी
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण शिक्षक दिनानिमित्त दि.५ सप्टेंबर रोजी उदगीर येथील कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात उत्कृष्ट कार्य आणि काम करणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकांचा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात प्रा.सौ.वर्षा गंगाधर बिरादार यांना उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्तव्यदक्ष उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे, संस्थेच्या कोषाध्यक्षा मृदुला पाटील, सदस्या प्राजक्ता पाटील, प्राचार्य डॉ.ओमप्रकाश श्रीरसागर आणि इतर विविध महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात उदगीर आणि परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील विविध प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा उदगीर येथील प्रा.सौ.वर्षा गंगाधर बिरादार यांचाही राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त गुणगौरव सोहळ्यात फेटा, प्रमाणपत्र, ट्रॉफी, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष सचिव डॉ. विजयकुमार पाटील व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
