निलंगा-(प्रतिनिधी)- गेल्या सात दिवसांपासून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या विरोधात निलंगा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत सरकारची अंत्ययात्रा काढून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
♦️मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावा म्हणून गेली तेरा महिने झाले मराठा आंदोलन सुरू आहे तरीही सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत म्हणून महाराष्ट्रात जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलने केले जात आहेत तरी आंदोलनाला यश मिळत नाही.सरकार मराठा समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने आज सरकारची अंत्ययात्रा काढली,या अंतयात्रेसाठी निलंगा तालुक्यातील गावागावातुन मराठा समाज शेकडोंच्या संख्येने सहभागी झाला होता.ही अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत घेऊन जाण्यात आली व त्याठिकाणी उपस्थित मराठा बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांच्या समोर मराठा समाजाच्या मागण्यांचा पाढाच वाचून दाखवला त्यावेळी उपस्थित महिला मुली बांधव यांच्या तीव्र भावना ऐकायला मिळाल्या, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्यांचे उपोषण सोडवावे अशी विनंती उपस्थित महिलांनी केली यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे‘, ‘एक मराठा लाख मराठा‘, ‘जय जिजाऊ जय शिवराय‘, तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

♦️दरम्यान आज सकाळपासूनच निलंगा शहरातील बाजारपेठ कडेकोट बंद होती,सर्व व्यापाऱ्यांनी या बंद ला पाठींबा दिला होता.
♦️उपविभागीय अधिकारी शरद झाडके व पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी मराठा समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडू असा शब्द दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.यावेळी निलंगा तालुक्यातील शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.