लातूर : धनगर आरक्षणाच्या एसटी अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांचे धनगर आरक्षणासाठी गेल्या १५ दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ लातूर जिल्ह्यातील सकल धनगर समाजातर्फे सोमवार (दि.२३) रोजी ३ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
धनगर समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला वारंवार मुदत देऊनही आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा उपोषणाला बसावे लागले आहे.
♦️मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांची तब्येत खालावत असून सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. शासनाने आश्वासने देऊनही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने धनगर समाजाकडून आंदोलने करण्यात येत आहेत. सरकारला इशारा म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक बंद ठेवला. रस्त्यावर मेंढ्या थांबवून रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. यावेळी मोठया संख्येने धनगर समाज उपस्थित होता. यावेळी एक रुग्णवाहिका रस्त्यावर येताच आंदोलकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन माणुसकीचे दर्शन घडवले.
♦️उपोषणस्थळी महत्त्वाची बैठक रस्ता रोको आंदोलनानंतर मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांच्या मार्गदर्शनात उपोषणस्थळी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली गेली. सरकार प्रत्येक वेळेस फसव्या घोषणा करत आहेत, त्यामुळे समाजाची दिशाभूल होत आहे. त्यामुळेच यापुढे एकजुटीने समाजाची दिशा ठरवून मार्गक्रमण असणार आहे, अशी भूमिका धनगर समाजाने यावेळी व्यक्त केली.