प्रतिनिधी:-मुनीर शेख
♦️परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री शरद सोळुंके सर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस तर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री महेंद्र कापडी सर यांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थित सर्वांनी या दोन महात्म्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
प्राथमिक विभागातील पियुष गुळवे व श्रेयस लोहार या दोन विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांची वेशभूषा परिधान केली होती. ते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. प्राथमिक तसेच माध्यमिक विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी या दोन्हीही महात्म्यांच्या जीवनाविषयी भाषणे सादर केली.या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच माध्यमिक विभागातील संस्कृत विभाग प्रमुख श्री निलेश काणेकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना संस्कृतम वदतू हे छोटेसे पुस्तक देऊन सर्वांचे अभिनंदन केले.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री महेंद्र कापडी सर यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांचा जीवनपट उलगडला. त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी यामधून आपण सर्वांनी बोध घेतला पाहिजे असे सर्वांना आवाहन केले. तसेच आपली शाळा,घर तसेच परिसर याची स्वच्छता आपण नियमितपणे राखली पाहिजे असे त्यांनी सांगितले.सौ.साधना गायकवाड यांनी स्वच्छ्ता सप्ताह अभियान याबद्दल माहिती सांगितली.
हा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसराची स्वच्छता देखील केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गीतांजली ताम्हणकर मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सौ प्रतिभा धुमाळ मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री शरद सोळुंके सर,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री महेंद्र कापडी सर, शिशुविहार विभाग प्रमुख सौ. सुप्रिया वारे मॅडम तसेच तीनही विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.