एसडीपीओ हनुमंत गायवाड यांची तत्परता
उमरखेड़
नांदगव्हाण नजीक राष्ट्रीय महामार्गावर स्कुटी वरून प्रवास करणाऱ्या दोघांना चिरडून वाहनासह फरार होऊ पाहणाऱ्या ट्रकचालकास सिनेस्टाईल पाठलाग करून अंबोडा गावाजवळ पकडण्यात आले. आज शनिवारी सकाळी दहा वाजता ही थरारक घटना घडली. स्कुटी ला भरधाव ट्रक ने चिरडल्यानंतर प्रवास करणारे दोघेही घटनास्थळीच ठार झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी दिली.
नांदेड कडून यवतमाळकडे जात असलेल्या ट्रक (क्र. एमएच ४९ एटी २९०८) चा चालक अमली पदार्थाच्या नशेत होता. तो जीवघेण्या वेगात ट्रक पळवित असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. नांदगव्हाण घाटाच्या पायथ्याला या ट्रक चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कुटीला अक्षरशः चिरडले. अपघात एवढा भीषण होता की, स्कुटीवरील दोघांचाही घटनास्थळी तडफडून मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक बेफाम वेगात राष्ट्रीय महामार्गावर दामटला. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची सूचना पोलिसांना दिली. क्षणाचाही विलंब न करता उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी लगेच महागाव पोलीस ठाण्याचे सहाय्यकारी पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सरस्वती राठोड, शेख वसीम, आणि पोलीसांचा ताफा सोबत घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला. अवघ्या १० मिनिटात अंबोडा गावाजवळ या ट्रक चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. महिंद्र नत्थुजी बागडे (५६) असे ट्रकचालकाचे नाव असून तो सावनेर येथील रहिवासी असल्याचे कळते. अपघातातील मृतकांची नावे अद्याप कळू शकली नाही.