भाजप किसान मोर्चाचे पांडुरंग माने यांची भाजपला सोडचिठ्ठी
आ. रोहित पवार यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश
जामखेड ता.१० -जामखेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस पांडुरंग माने यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतली.
आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांच्या वतीने आज जामखेडमध्ये सहकार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सहकार मेळाव्यात भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस, पांडुरंग माने यांनी आमदार रोहित पवार यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपचे कट्टर कार्यकर्ते नितीन राऊत यांनीही राष्ट्रवादीची स्वाभिमानाची तुतारी हाती घेतली. पांडूरंग माने हे आमदार राम शिंदे युवा मंच चे अध्यक्ष असून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. आमदार रोहित पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून त्यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी तळमळ पाहून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश करत असल्याची भावना पांडुरंग माने यांनी व्यक्त केली.
आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात मतदारसंघात रस्ते, पाणी, सिंचन, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण, एसआरपीएफ सेंटर, शासकीय इमारती, अध्यात्मिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले. याच कामाच्या बळावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि हीच विकामकामे आमदार रोहित पवार यांना विजयाचा गुलाल लावणार अशी जोरदार चर्चा सध्या गावोगावी, वाडी वस्त्यावर सगळीकडे ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.
नंदु परदेशी
एन टी व्ही न्युज जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर