फुलचंद भगत वाशिम – सामाजीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या भिमसंग्राम साामाजीक बहूउद्देशिय संस्थेला शिक्षण, आरोग्य, युवक कल्याण, महिला विकास, आरोग्य, स्वयंरोजगार आणि सामाजीक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. याबाबतचे प्रमाणपत्र संस्थेला नुकतेच प्राप्त झाले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी ही माहिती दिली. भिमसंग्राम सामाजीक संस्था वर्ष २०१६ पासून सामाजीक क्षेत्रात कार्यरत आहे. मागील आठ वर्षात संस्थेने व्यसनमुक्ती क्षेत्रात जनजागृतीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. अनेक लोकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी त्यांना औषधोपचार आणि समुपदेशन करण्याचे काम संस्थेने केले आहे. व्यसनमुक्ती विषयावर अनेक सेमिनार आणि कॅम्प संस्थेने घेतले आहेत. यासोबतच गरीब मागासलेल्या प्रवर्गातील महिला, विद्यार्थी, मुली यांना वेगवेगळे प्रशिक्षण उपलब्ध करुन त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी विशेष कार्य केले आहे. तसेच महिला सबलीकरण, बालमजुरीचा विरोध, ग्राहक जनजागृती व ग्राहक हक्क संरक्षण, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ भारत अभियान, युवक कल्याण, रोजगार आदी क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. यासोबतच संस्थेने बाल, युवक, महिला, जेष्ठ नागरीक यांच्या हिताचे अनेेक प्रश्न उचलून प्रखर आंदोलनाची भूमिका घेतली आहे. व हे प्रश्न तडीस लावले आहेत. याची दखल घेवून अनेक सामाजीक संस्था आणि संघटनांनी संस्थेचा पुरस्कार देवून गौरव केला आहे. संस्थेच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असलेल्या आयएसओ ९००१ : २०१५ मानांकनाने सन्मानित करण्यात आले आहे. या यशामुळे आपल्याला सामाजीक कार्य करण्यासाठी अधिक बळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी दिली आहे.