(सचिन बिद्री:उमरगा)
तालुक्यातील गृहउद्योग चालविणाऱ्या महिला भगिनींनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाल्यास जास्तीत जास्त मालाचा खप होऊन महिला आर्थिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. यासाठीच ज्ञानज्योतीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी “ज्ञानज्योती” संस्थेच्या माध्यमातून सदैव तत्पर असल्याची ग्वाही ऍड. आकांक्षा चौगुले यांनी यावेळी दिली.
ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उमरगा, ग्रामऊर्जा फाउंडेशन, अंबाजोगाई, युथएड फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यात प्रथमच शनिवार दि.११ जानेवारी ते १२ जानेवारी रोजी २ दिवस श्रीराम मंगल कार्यालयात उद्योजकता एस समिट 2025 व मकर संक्रातीनिमीत्त महिलांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या समीट मध्ये उमरगा तालुक्यातील जवळपास २८ उद्योजकांनी सहभाग नोंदवत आपल्या उद्योगा विषयी कल्पना सादर केल्या. यापैकी ५ स्पर्धकांची निवड बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय एस समीट साठी झाली आहे. त्यांना उद्योजक प्रशिक्षण संदर्भात ७ दिवसीय बुटकॅम्प व व्यवसाय विकासासाठी लागणारे मार्गदर्शन मिळणार आहे.
यावेळी अजित जाधव पाटील जनाई मिल्क प्रॉडक्ट रा.एकोंडी लो., राधा थोरे, सुरभी ब्युटी पार्लर उमरगा, प्रीती दयानंद सुतार, आदर्श महिला उत्पादक गट तुगाव, शुभांगी शाईवाले, शाईवाले अँड ग्रुप, अस्मिता सूर्यवंशी शेवया उद्योग गुंजोटी हे स्पर्धक विजेते ठरले असुन त्यांना उषाताई गायकवाड व पो. नि.आश्विनी भोसले आणि ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा ऍड आकांक्षाताई चौगुले यांच्या शुभहस्ते विजेते प्रमाणपत्र देण्यात आले.

यासोबतच मकर सक्रांतीनिमीत्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रदर्शन व विक्री या उपक्रमासही महिला व नागरिकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात जवळपास १८ विविध साहित्य व खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. दरम्यान माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या सर्व स्टॉल्सना भेटी देऊन उद्योजक भगिनींचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा ॲड.आकांक्षा चौगुले, ग्रामऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्षा दादासाहेब गायकवाड, प्रा.वर्षा मरवाळीकर, ज्योतीताई चौगुले, नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, नगरसेवीका सारीकाताई बंगले, अमर देशटवार आदी उपस्थित होते.