♦️येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) ता. २१

कळंब तालुक्यातील चोराखळी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ असून येथील पापनाश मंदीर, परिसराचा विकास होण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष देशभरात साजरे केले जात असुन त्यांचे चोराखळी हे आजोळ आणि जन्मगाव असून इथे अहिल्यादेवींनी बांधलेले महादेवाचे पापनाश हे दगडी बांधकाम केलेले हेमाडपंथी, पुरातन मंदिर असून याला महाराष्ट्र शासनाचा ‘क’ दर्जा प्राप्त आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी स्वतःच्या खाजगी खर्चातून केलेल्या बांधकामात जवळपास २५०० चौ.फुट मुख्य मंदिर,सभामंडप, पाण्याचा दगडी तलावमधील जुने मंदिर हे जिर्ण झालेले असुन त्याच्या देखभालीची,दुरुस्तीची आवश्यकता आहे.शिवाय अहिल्यादेवींच्या आई सुशीलादेवी शिंदे यांची समाधी देखील जिर्ण स्वरूपात आहे.चोराखळी येथील श्री क्षेत्र पापनाश देवस्थानस्थळी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तसेच विविध पर्यटन विकासकामे,शोभा वाढविण्यासाठी स्मरणवस्तु,संग्रहालय, अहिल्यादेवींचा जिवनपरिचय दृष्य / देखावा अशी विकासकामे चौंडी या त्यांच्या गावाच्या धर्तीवर होणे आवश्यक आहे.


असे निवेदनात म्हंटले आहे . चोराखळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक उभा करण्यासाठी मंदिराची १०५ एकर जमीन उपलब्ध असुन तिथे त्यांचे स्मारक उभा केल्याने समाजासाठी ते प्रेरणादायी ठरेल असे जिल्हाधिकारी यांना (ता.२०) दिलेल्या निवेदनात चोराखळी ग्रामस्थांनी म्हंटले आहे.निवेदनावर सरपंच सिमा अक्रुर सोनटक्के,पापनाश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिगांबर साहेबराव मैंदाड,सुभाष अशोक मैंदाड,अमोल जगन्नाथ मैंदाड,रविंद्र हरिबा मैंदाड, लिंबराज डुकरे,ॲड.बबीता मैंदाड,ॲड.तेरकर आदींसह निवेदनावर शंभराच्या वर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत .