MUMBAI | कानातील एअरफोनमुळे ट्रेनचा आवाज न आल्याने ट्रेनच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैष्णवी रावल (वय-१६, राहणार- माकने ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना ही घटना घडली. वैष्णवी रावल हिने कानात एअरफोन घातल्यामुळे गुजरात कडे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेत गुरुवार (दि.२३) मृत्यू झाला. ती इयत्ता दहावी मध्ये शिकत होती. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पूर्व पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे फाटका जवळ पादचारी पुल नसल्याने विद्यार्थीनीचा जीव गेला. यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील येण्या-जाण्यासाठी रेल्वे फाटकात पादचारी पुल बांधावा यासाठी माकणे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात माकणे ग्रामस्थांनी गर्दी केली होती. आपण पाहतो की शालेय तसेच महाविद्यालय विद्यार्थी यांच्याकडे हमखास मोबाईल असतात, त्यामुळे गाणी ऐकण्यासाठी हे एअरफोन घालून दररोज प्रवास सुरू असतो. त्यावेळी एखाद्या गाण्यामध्ये हे मग्न असतात व त्यावेळी रेल्वे रूळ ओलांडताना येणाऱ्या रेल्वे गाडीचा व वाहनांचा त्यांना आवाज येत नाही व हकनाक ते आपला जीव गमावून बसतात. तरुण वर्गात असणारे हे वेड जीवावर बेतते. यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन आवश्यक झाले आहे, स्वयंसेवी संघटना, पोलीस विभाग यांनी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
#railway #Headphones#Mumbai #girlaccident