31 जानेवारी रोजी
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील तीन अधिकारी आपल्या 35-36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयात 31 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या गौरवासाठी विशेष सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी पोलीस उपनिरीक्षक आबा गोपाळ बोराडे (35 वर्षे सेवा), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदिपान भानुदास भेरे (35 वर्षे सेवा), आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक छोटुलाल बाबुलाल बुंदेलखंड (36 वर्षे सेवा) यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
पोलीस अधीक्षकांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी अधिकाऱ्यांनी बजावलेल्या निःस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत “पोलीस दल कायम तुमच्या सोबत राहील,” असे आश्वासन दिले.
या वेळी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही भावना व्यक्त केल्या. ऋषिकेश संदीपान भेरे यांनी सांगितले की, “माझ्या वाढदिवसाला बाबा कधीच घरी नव्हते. प्रत्येक सण-उत्सवाच्या वेळी त्यांच्या परतण्याची वाट बघावी लागायची. पण आता ते कायम आमच्यासोबत असतील, हीच मोठी आनंदाची बाब आहे.”

पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार पेन्शन आणि इतर सेवानिवृत्ती लाभ तत्काळ वितरीत करण्यात आले, जेणेकरून अधिकाऱ्यांना कार्यालयीन चकरा माराव्या लागू नयेत. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया सुलभ केल्याबद्दल समाधान व्यक्त करत पोलीस अधीक्षकांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनात प्र. पोलीस उपअधीक्षक महादेव गोमारे, स.पो.नि. सचिन पंडीत, पोलीस अंमलदार हबीब शेख, प्रविण पंडित, आशा बांगर यांनी विशेष मेहनत घेतली.
या समारंभाने पोलिस दलातील निष्ठा, त्याग आणि कर्तव्यभावनेचा सन्मान केला गेला. सेवानिवृत्त अधिकारी आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा घेत आनंदाने पोलीस दलाचा निरोप घेतला.
NTV NEWS MARATHI
बिडकीन प्रतिनिधी अलीम शेख छत्रपती संभाजीनगर