गडचिरोली
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील वॉर्ड क्रमांक-2 मध्ये वास्तव्यास असलेल्या 24 वर्षीय अनाथ तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 15) सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रागिणी गलबले असे मृत तरुणीचे नाव आहे.

मृत रागिणी गलबले हिचे आई-वडील बालपणीच मरण पावले. आष्टी हे तिच्या मामाचे गाव असल्याने ती आष्टी येथेच वास्तव्यास राहायची. ती भांडेधुणी व इतर मोलमजुरीची कामे करायची. शनिवारी सकाळच्या सुमारास ती राहत असलेल्या लीना गोंगले यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नसले तरी तिच्या मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तिचा मृत्यू संशयास्पद असून तिचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

प्रतिनिधी भास्कर फरकडे एन टिव्ही न्युज मराठी गडचिरोली