सारसाळे, ता. दिंडोरी शिवारात असलेल्या पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन १२ वर्षीय शालेय मैत्रीणींचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला असून एकीस वाचवण्यास ग्रामस्थांना यश आले.

दिंडोरी तालुक्यातील सारसाळे गावालगत असलेल्या पाझरतलावावर रविवार, ता. १६ रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान गायत्री धनराज घुटे, वय १२ वर्षे रा सारसाळे ता. दिंडोरी व राधिका एकनाथ वटाणे वय 12 वर्षे रा मुळ गाव काझीमाळे हल्ली रा. सारसाळे हे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असतांना यातील एकीचा पाय घसरुन पाण्यात पडली.

पडलेल्या मैत्रीणीला वाचवण्याचा प्रयत्नात दुसरी पाण्यात पडली ही बाब जवळच असलेल्या चैतन्या प्रविण गायकवाड हीच्या लक्षात आल्यानंतर तीन आरडा ओरड करुन तीनेही पाण्यात उतरुन बुडणाऱ्या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीही पाण्यात बुडू लागल्याने परीसरातील काहींनी धाव घेत चैतन्याहीस बाहेर काढूून वाचवले. परंतु गायत्री धनराज घुटे व राधीका वटाणे ह्या दिसल्या नाहीत. त्यामुळे पोहणाऱ्या तरुणांनी पाण्यात उतरुन शोध घेवून १० ते १५ मिनीटांनी दोघींनाही बाहेर काढले व तातडीने खाजगी वाहनाद्वारे वणी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान वैद्यकिय अधिकारी डॉ. रासवे यांनी त्यांना तपासून मयत घोषीत केले. दरम्यान सांयकाळी शवविच्छेदन करुन दोघी मैत्रिनींचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येवून रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गायत्री घुटे, राधिका वटाणे व वाचलेली चैतन्या गायकवाड ह्या तीघीही सारसाळे जवळच असलेल्या करंजखेड जिल्हा परीषद शाळेत इयत्ता ६ वी इयत्तेत शिकत होत्या. सारसाळे येथे ४ थी पर्यंत वर्ग असल्याने त्या दोन वर्षापासून करंजखेड येथे दोन तीन किमा अंतर चालत येवून शिक्षण घेत होत्या. मयत दोघीही अभ्यासात चांगल्या असल्याचे वर्गशिक्षक राजेंद्र कापसे यांनी सांगत धक्कादायक व दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले.
दिगंबर पाटोळे वणी नाशिक