CHH. SAMBHAJINAGAR | गंगापूर, २ एप्रिलः गंगापूर तालुक्यातील संजरपूर शिवारात बुधवारी (दि. २) दुपारी एका दुर्दैवी घटनेत दोन मावस भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. रोहित रमेश भांगे (वय २४, रा. जळका, ता. नेवासा) आणि धनंजय अण्णासाहेब सोनवणे (वय २८, रा. शिंदेवाडी) असे मृत तरुणांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजरपूर शिवारातील अण्णासाहेब काशीनाथ सोनवणे यांच्या शेततळ्यात हे
दोघे दुपारी तीनच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते.
मात्र, तळ्यातील शेवाळामुळे त्यांना बाहेर येता आले नाही. त्यांनी ठिबक सिंचनाच्या नळीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नळी तुटल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले.
काही वेळाने शेजारील नातेवाईकांना त्यांचा काहीही पत्ता न लागल्याने त्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. त्यावेळी दोघेही पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. आरडाओरड होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. मोरया रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, कल्पेश कराळे, सौरभ आमराव, साबणे, तुषार पाठे आणि गणेश बेडवाळ यांनी घटनास्थळी पोहोचून
नागरिकांच्या मदतीने दोघांना तळ्यातून बाहेर काढले. तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टर विजय केंद्रे यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन केले. गंगापूर पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोज घोडके करीत आहेत.