जामखेड प्रतिनिधी
दि 26 एप्रील

रविवारपासून सीना कालव्याचे आवर्तन सुरु करण्याचे आश्वासन

कर्जत-जामखेड ता. २५ एप्रिल : कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळावे, यासाठी आज आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे , मु्ख्य अभियंता हेमंत धुमाळ यांच्यासोबत पुण्यात सिंचन भवन येथे बैठक घेतली आणि सीना व कुकडी कालव्यांच्या उन्हाळी आवर्तनावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत रविवारपासून (दि.२७ एप्रिल ) सीना कालव्याचे पुर्ण दाबाने आवर्तन सुरू करण्याचा निर्णय झाला असून कुकडीबाबतही तातडीने निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भात उद्या (शनिवार दि.२६ एप्रिल ) सीना मध्यम प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे.

मतदारसंघातील सिंचनाच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आमदार रोहित पवार हे नेहमीच पाठपुरावा करत असतात. कर्जत-जामखेड मतदारसंघातील सीना आणि कुकडी कालवा हा महत्त्वाचा असून मतदारसंघातील अनेक गावांमधील शेती या कालव्यावर अवलंबून आहे. ही गावे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्यासाठीही सर्वस्वी कुकडी, सीना व घोड कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढल्याने पाण्याची पातळी खालावली आहे परिणामी वेळेत पाणी न मिळाल्यास चारा पिके, फळबागा आणि उन्हाळी हंगामातील इतर पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांसोबत मतदारसंघातील शेतकरी व पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली. कुकडी कालव्याबाबत कर्जत तालुक्यातील २५ भूसंपादन प्रस्तावांसाठी ४५ कोटी १८ लाख रुपयांची मागणी असून, हे प्रस्ताव लवकर मार्गी लावण्याची विनंती यावेळी बैठकीत आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच चारी दुरुस्ती, कोळवडी विभागातील प्रलंबित भूसंपादनाची कामे, प्रत्येक शाखा कालव्याच्या तोंडावर स्वयंचलित गेज मीटर बसवणे, आवश्यक त्या ठिकाणी कालव्यांचे अस्तरीकरण त्वरित पूर्ण करणे यासह सीना प्रकल्पांशी संबधित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

मागच्या वेळी कमी दाबाने आवर्तन सोडल्यामुळे मतदारसंघातील करमनवाडी, बारडगाव दगडी, तळवडी, पिंपळवाडी, पाटेवाडी, निमगाव डाकू, दिघी, चौंडी, थेरवडी तलाव व कोपर्डी तलाव या भागांमध्ये पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे लाभक्षेत्रातील सर्वांनाच पाणी मिळावे यासाठी हेड टु टेल पर्यंत पाणी पोहचणे गरजेचे आहे. त्यासाठी पुर्ण दाबाने आवर्तन सोडवण्याची आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी बैठकीत मांडली.

कोट,

आजच्या बैठकीत सीना कालव्यातून रविवारी (ता. २७ एप्रिल) आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. तसंच कुकडी कालव्यातूनही लवकरात लवकर आवर्तन सोडण्यासाठी मंत्रीमहोदय आणि अधिकारी यांच्याकडंही पाठपुरावा सुरु आहे. त्यानुसार कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून यामध्ये त्याबाबतचे आदेश देण्यात येणार आहेत. याशिवाय शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचण्यासाठी आवर्तनाची मुदत ४० दिवसांची करण्याची मागणीही यावेळी केली.

नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124