उमरग्यात दुचाकी चोरांची टोळी जेरबंद, आंतरराज्यीय कनेक्शन उघड!

गेल्या काही कालावधीपासून उमरगा शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. उमरगा पोलीस ठाण्यात सातत्याने दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या वाढत्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी विशेष लक्ष घालून वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या. अखेर, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, परराज्यातील एका दुचाकी चोराला पकडण्यात उमरगा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे लाखो रुपयांच्या चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की, उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याने पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार दि. ३ जुलै रोजी पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी व मोटारसायकलचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना गुप्त बातमी मिळाली की, भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर एक इसम होंडा युनिकॉर्न मोटारसायकलवर संशयीतरित्या फिरत आहे. ही माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता, कुमार थॉमस अकुला (वय ३२ वर्षे, रा. कपराला थिप्पा, ता. बोगेले, जि. नेल्लूर, राज्य आंध्र प्रदेश) हा संशयीतरित्या थांबलेला आढळून आला.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न मोटारसायकलच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. मोटारसायकलबद्दल ऑनलाइन पडताळणी केली असता, सदर मोटारसायकल पोलीस स्टेशन कोरत्तूर, जि. रंडहिल्स, राज्य-तामिळनाडू येथील सीएसआर क्र. ५१५/२०२५ या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच, त्याने उमरगा शहरातून मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले.

त्यानंतर त्याला उमरगा पोलीस ठाण्यात गुरनं. ४०४/२०२५, गुरनं. ४२८/२०२५, गुरनं. ३५७/२०२५ या गुन्ह्यांत अटक करून, त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली. त्याच्याकडून खालील वर्णनाच्या व किमतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या:

पो.स्टे. उमरगा गु.र.नं. ३५७/२०२५ – रु. २५,००० किमतीची टीव्हीएस स्पोर्ट मो.सा.क्र. MH-२५-AY-६०६८

पो.स्टे. उमरगा गु.र.नं. ४०४/२०२५ – रु. २०,००० किमतीची हिरो एचएफ डिलक्स मो.सा.क्र. MH-२५-AN-३०४८

पो.स्टे. उमरगा गु.र.नं. ४२८/२०२५ – रु. ५०,००० किमतीची होंडा युनिकॉर्न मो.सा.क्र. MH-२५-AN-५४१४

पो.स्टे. निगडी गु.र.नं. ७९२/२०२३ – रु. २०,००० किमतीची हिरोहोंडा सीडी डिलक्स मो.सा.क्र. MH-१४-BD-९२२६

पो.स्टे. कोरत्तूर राज्य-तामिळनाडू सीएसआर नं. ५१५/२०२५ – रु. ८०,००० किमतीची होंडा युनिकॉर्न मो.सा.क्र. TN-१८-W-३३१६

अशा प्रकारे, परराज्यातील आरोपी कुमार थॉमस अकुला याला पकडून, त्याने उमरगा पोलीस स्टेशन हद्दीत येऊन चोरलेले तसेच इतर जिल्हा व परराज्यातील चोरीच्या गुन्ह्यांमधील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून, उमरगा पोलिसांनी अत्यंत मोलाची व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोहेकॉ वाल्मिक कोळी, पोहेकॉ शिवलिंग घोळसगाव, पोना यासीन सय्यद, पोकॉ योगेश बिराजदार, पोकॉ नवनाथ भोरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *