वाशिम:
वाशिम जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिलेल्या आदेशानुसार, वाशिम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिनांक ८ जुलै २०२५ रोजी वाशिम-हिंगोली महामार्गावरील तोंडगाव फाट्याजवळील टोलनाक्यावर झालेल्या तोडफोड आणि लुटमारीच्या प्रकरणात फरार असलेल्या मुख्य आरोपींना अखेर जेरबंद करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, ज्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेप्रकरणी, आरोपी गजानन कुंडलिक वैरागडे (वय ४०, रा. चिखली घुले), उमेश सुधाकर टोलमारे (वय २५, रा. शिवाजी नगर, काटा रोड, वाशिम) आणि एका अज्ञात इसमाने फिर्यादीच्या खिशातून ५,००० रुपये जबरीने काढून घेतले होते. इतकेच नाही, तर त्यांनी टोलनाक्यावरील बूथच्या काचा फोडून सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान केले होते. या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात अप. क्र. २२२/२५ कलम ३०८, ३०९ (१) बी.एन.एस. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू होता, मात्र ते सतत पोलिसांच्या हाती लागत नव्हते.
दिनांक १८ जुलै २०२५ रोजी वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपींना पकडण्यासाठी तात्काळ पथक अकोला जिल्ह्यासाठी रवाना करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपी गजानन कुंडलिक वैरागडे आणि उमेश सुधाकर टोलमारे यांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि जगदीश बांगर आणि अंमलदार गजानन अवगळे, विनोद सुर्वे, सुरज खडके, आशिष बिडवे, गजानन गोटे, दिपक घुगे, विठ्ठल महाले, तुषार ठाकरे, संदीप दुतोंडे, सुनिल तायडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्रीदेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल गंधे आणि पोशि अनिल बोरकर (पोलीस ठाणे वाशिम ग्रामीण) हे करत आहेत.
फुलचंद भगत एनटीव्ही न्यूज मराठी, वाशिम.