छत्रपती संभाजीनगर
राज्यात सध्या रक्ताची तीव्र आवश्यकता निर्माण झाली आहे, प्रत्येक दोन सेकंदाला रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण दिलेल्या एका रक्ताच्या बॅगमधून मिळणाऱ्या आरबीसी (RBC), प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या घटकांमुळे किमान तीन जणांचे प्राण वाचवता येतात. याच जाणिवेतून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात, जिल्ह्यात आणि तालुक्यात ‘महारक्तदान’ या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करून रक्ताची काही अंशी कमतरता भरून काढण्याचा संकल्प केला असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत बंब यांनी केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर-खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने (दि. २२) गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील तीन मंडळांमध्ये आठ ठिकाणी विविध रक्त संकलन करणाऱ्या रक्तपेढ्यांच्या माध्यमातून तब्बल ६३६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
खुलताबाद तालुक्यातील तीन मंडळांतील बाजारसावंगी, खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, गंगापूर, शेंदूरवाडा, तुर्काबाद, वाळूज, शेनपुंजी, रांजणगाव या आठ ठिकाणी मोठ्या उत्साहात रक्तदान करण्यात आले.
महिलांची रक्तदानासाठीची संख्या अजूनही कमी असल्याने, यावेळी मनीषा बंब यांनी उपस्थित महिलांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच, आमदार बंब यांची कन्या इंदिरा बंब आणि पत्नी मनीषा बंब यांनी गंगापूर तालुक्यातील वाळूज आणि शेनपुंजी रांजणगाव येथे स्वतः रक्तदान करून या रक्तदान अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी इतर महिलांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले.
गंगापूर उत्तर मंडळ: ३०१
गंगापूर दक्षिण मंडळ: १८२
खुलताबाद मंडळ: १५३
गंगापूर विधानसभा मंडळात एकूण: ६३६ रक्तदाते
दरम्यान, आमदार बंब यांनी सकाळपासूनच सर्व रक्तदान केंद्रांना वैयक्तिक भेटी देऊन तेथील रक्तदात्यांना प्रोत्साहित केले आणि त्यांचे आभार मानले. या शिबिरासाठी गंगापूर उत्तर तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, गंगापूर दक्षिण तालुकाध्यक्ष सुरेश शिंदे आणि खुलताबाद तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रतिनिधी: अमोल पारखे
एनटीव्ही न्यूज मराठी, गंगापूर/खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर.