
हिंगोली: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी सुरेश आप्पा सराफ यांची निवड झाल्याने काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याचे मानले जात असून, जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसमधील गटबाजीमुळे अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला होता, ज्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला घरघर लागली होती आणि मोठी गळती लागली होती. येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाने अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांचे खांदेपालट केले आहे.

याच पार्श्वभूमीवर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी सुरेश आप्पा सराफ यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली येथील सराफ घराणे हे गेली अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहे. नागनाथ आप्पा सराफ, वैजनाथ आप्पा सराफ, सुधीर आप्पा सराफ आणि आता सुरेश आप्पा सराफ या सराफ घराण्यातील व्यक्तींनी काँग्रेस पक्षात असताना हिंगोलीचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही सराफ घराणे काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आहे. त्यामुळे सुरेश आप्पा सराफ यांची नुकतीच काँग्रेस पक्षाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने हिंगोलीत काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली असल्याचे मानले जात आहे. नवीन जिल्हाध्यक्षांचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.
प्रतिनिधी फारूक शेख
एनटीव्ही न्यूज मराठी, हिंगोली.